Varkari Pesion Scheme
विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारनं मदतीचा हात देऊ केला आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळच्या (Mukhyamantri Varkari Sampradaya Mahamandal) वतीनं शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. कीर्तनकारांना आरोग्य विमा (insurance) कवचही दिलं जाणार आहे.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या महत्त्वाच्या योजना कोणत्या?
सर्व पालखी मार्गांची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा आणि सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन.
आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच.
वारकरी भजनी मंडळाला भजन आणि कीर्तन साहित्यासाठी (टाळ, मृदंग, वीणा आदी) अनुदान.
कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना.
पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास.
चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही.
महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये वारकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केलं जाणार आहे. तसेच, वारकऱ्यांना पेन्शन लागू केलं जाणार आहे. या महामंडळाच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाला देखील गती येईल.