मोफत वीज हवी! अशी आहे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना…

pm free solar yojana

केंद्र सरकारने ‘पंतप्रधान – सूर्यघर मोफत वीज योजना’ सुरू केली आहे. त्यात तीन किलोवाॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे.

घराच्या छतावर रूफ टॉप सोलर (,roof top solar) वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. त्यात गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते.

सोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळणे शक्य आहे.

केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्याच्या १९ फेब्रुवारीच्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवाॅट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवाॅटला तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

दोन किलोवाॅटहून अधिक एक किलोवाॅट म्हणजे तीन किलोवाॅटचे सिस्टिम बसविणाऱ्या ग्राहकाला एका किलोवाॅटला अठरा हजार रुपये अधिकचे अनुदान मिळेल.

अर्थात एक किलोवाॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवाॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवाॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट ग्राहकाला मिळेल.

वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे.

देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केलेली असून राज्यातील ग्राहकांनी योजनेचा लवकरात लवकर लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Comment