तुमच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असू शकते?

land registration details

जास्तीत जास्त किती जमीन नावावर असू शकते?

सिलिंग कायद्यान्वये, एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन असू शकते याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

त्यानुसार,

  • बारमाही पाणीपुरवठा किंवा बागायत जमिनीसाठी 18 एकर एवढं कमाल धारणा क्षेत्र निश्चित करण्यात आलंय.
  • बारमाही पाणीपुरवठा नसलेली पण वर्षातून एका पिकासाठी खात्रीचा पाणीपुरवठा असलेल्या जमिनीसाठी 27 एकर एवढं कमाल धारणा क्षेत्र निश्चित करण्यात आलंय.
  • हंगामी बागायत किंवा भातशेतीची जमीन असेल, तर त्यासाठी 36 एकर ही जमीन धारणेची मर्यादा आहे.
  • कोरडवाहू जमिनीसाठी जमीन धारणेची मर्यादा 54 एकर एवढी आहे.

सिलिंग कायद्याबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी

सिलिंग कायद्यानुसार, जमिनीच्या प्रत्येक हस्तांतरणासाठी नजराणा रक्कम अदा करणं आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं अनिवार्य असतं.

सिलिंग कायद्यान्वये,प्रदान किंवा हस्तांतरण केलेली जमीन भूधारणा वर्ग-2 ची असेल. अशी जमीन धारणाधिकार वर्ग-1 मध्ये रुपांतरित करण्याची कायद्यात तरतूद नाही.

सिलिंग कायद्यान्वये मिळालेली जमीन एखाद्या औद्योगिक उपक्रमाला हवी असेल किंवा खऱ्याखुऱ्या कृषितर प्रयोजनासाठी आवश्यक असेल, तर अनार्जित प्राप्तीच्या 75% एवढी रक्कम अदा केल्यास जिल्हाधिकारी अशा हस्तांतरणास परवानगी देऊ शकतात.

अनार्जित प्राप्तीच्या 75% म्हणजेच चालू बाजारभाव आणि अर्जदारास मूळ ज्या भोगवटा किंमतीत जमीन मिळाली होती, ती किंमत यामधील फरकाच्या 75% एवढी रक्कम.

सिलिंग कायद्यान्वये मिळालेली जमीन, शैक्षणिक किंवा धर्मादाय संस्थेच्या कामासाठी हवी असेल, एखाद्या सहकारी संस्थेस जमीन हवी असेल, आणि जर अर्जदार 65 किंवा अधिक वयाचा असेल आणि इतर कोणत्याही आजारामुळे शेती करण्यास असमर्थ असेल, तर सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र दिल्यास, अर्जदारानं अनार्जित प्राप्तीच्या 50 % एवढी रक्कम अदा केल्यास जिल्हाधिकारी अशा हस्तांतरणास परवानगी देऊ शकतात.

सिलिंग कायद्यातील कलम -27 अन्वये, वाटप करण्यात आलेल्या जमिनीच्या वापरात देखील बदल करण्याची तरतूद आहे. पण जमिनीच्या वापरात बदल अनुज्ञेय असेल किंवा जमिनींचं हस्तांतरण झालं असेल तरी, त्या जमिनी भोगवटादार वर्ग-2 च्याच राहतील.

Leave a Comment